लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम) : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदानाच्या माध्यमातून दुष्काळावर मात म्हणून जलसंधारणांच्या कामांसाठी मंगरूळपीर तालुक्यातील ११ गावांत नागरिकांची एकजूट बघावयास मिळत आहे. ११ गावातील २८७१ नागरिकांनी श्रमदान करून ४२१४ घनमीटरची कामे एका दिवसात १ मे रोजी केली आहेत.राज्यात गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतर्गत १ मे हा महाश्रमदान दिन म्हणून साजरा करण्यात आला. मंगरुळपीर तालुक्यात पिंप्री खुर्द या गावासह जांब, बोरव्हा बु., नागी, जोगलदरी, चकवा, लखमापुर, गणेशपुर, जनुना बु., चिंचाळा , पिंप्री अवगण, माळशेलू या ११ गावांत श्रमदान करण्यात आले. जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, मुख्य कार्यकारी दिपककुमार मीणा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, पानी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे, उपविभागीय अधिकारी गोगटे, तहसीलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी टाकरस, उमेदचे श्रद्धा चक्रे, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यासह विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, भुसावळ, नागपुर, वर्धा, अमरावती, पुणे येथून जलमित्र सुद्धा श्रमदान करण्यासाठी आले होते. वॉटर कप स्पर्धेसाठी मंगरुळपीर तालुक्याचे हे दूसरे वर्ष असून या वर्षी ५९ गावाने स्पर्धेत सहभाग घेतला. २० गावांत जलसंधारणची कामे श्रमदानमधून तर कुठे मशीनद्वारे कामे सुरू आहेत. तालुक्यातील ११ गावातही मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आदींनीसुद्धा सहभाग घेतल्याने गावकºयांचा उत्साह वाढला आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी गावकºयांची एकजूट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सदर कामाला जलचळवळीचे स्वरुप आले असल्याचा दावा केला जात आहे. जलसंधारणांच्या कामांसाठी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक समाधान वानखडे, अतुल तायडे, चेतन आसोले, कल्याणी वडस्कर, मयुरी काकड़, दिपमाला तायडे, निलेश भोयरे, अक्षय सर्याम, आश्विन बहुरूपी, जलमित्र गोपाल भिसडे, देवानंद काळबांडे आदी परिश्रम घेत आहेत.
Water Cup Competition ११ गावातील नागरिकांचे श्रमदान; ४२१४ घनमीटरची कामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 3:04 PM