लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कारंजा तालुक्यातून वॉटर कप स्पर्धेत यंदा सहभागी झालेल्या विळेगाववासियांच्या श्रमदानाची फलश्रृती झाली आहे. येथील ग्रामस्थांच्या श्रमदानामुळे हे गाव पाणीदार झाले असून, या स्पर्धेंतर्गत खोदलेले शंभर चौरस फुट आकाराचे शेततळे आता काठोकाठ भरले आहे. याच कामगिरीमुळे हे गाव स्पर्धेत तालुक्यातून प्रथम आले आहे.पाणी फाऊंडेशनच्यावतीने यंदा आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत कारंजा तालुक्यातील ३० गावांनी सक्रीय सहभाग घेत श्रमदानातून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे केली. यामध्ये विळेगावचाही समावेश होता. विळेगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून गावकºयांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत होता. प्रत्येक उन्हाळ्यात महिला, पुरुषांसह बालकांनाही पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. या पाणीटंचाईला हद्दपार करण्याचा निर्धार येथील गावकºयांनी केला आणि वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदानातून जलसंधारणाची अनेक कामे केली. माती नाला बांध, दगडी बांध, ढाळीचे बांध, गॅबियन बंधारे, सीसीटी यांच्यासह रोपवाटिका आणि शंभर चौरस मीटर आकाराच्या भव्य शेततळ्याचाही समावेश आहे. शेततळ्याच्या कठीण कामासाठी त्यांनी जेसीबी मशीनचाही आधार घेतला. आता या कामाचे फलित झाले असून, गावातील पाणी साठवण क्षमता लाखो लीटरने वाढली आहे. कारंजा तालुक्यात गुरुवार १६ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे वॉटर कप स्पर्धेत केलेल्या सर्व कामांच्या ठिकाणी मोठा जलसंचय झाला असून, येथील शेततळे आता काठोकाठ भरले आहे. त्यामुळे विळेगाववासियांची पाणीटंचाईची समस्या कायमच मिटणार आहे.
‘वॉटर कप’मधील विळेगाववासियांच्या श्रमदानाची फलश्रृती; शेततळे भरले काठोकाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 6:15 PM