लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच वाशिम जिल्हय़ात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत असून, एरव्ही जानेवारी महिन्यात जाहीर होणारा पाणीटंचाई कृती आराखडा यंदा मात्र डिसेंबरमध्येच जाहीर झाला आहे. ५१0 गावांच्या या आराखडयात टंचाई निवारणाच्या ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या असून, त्यावर ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.जिल्ह्यात उद्भवणार्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी कृती आराखडा तयार करून उपाययोजना आखल्या जातात. दरम्यान, २0१७ मधील कृती आराखडा चालू वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जाहीर झाला होता. २५२ गावांमध्ये करावयाच्या २५२ उपाययोजनांसाठी २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा मात्र डिसेंबरमध्येच प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ ५७८ उपाययोजनांची आखणी केली असून, त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
जिल्हय़ात मंगरूळपीर तालुका ‘डेंजर झोन’मध्येजिल्हय़ातील इतर तालुक्यांच्या तुलनेत यंदा मंगरूळपीर तालुका पाणीटंचाईच्या बाबतीत ‘डेंजर झोन’मध्ये आहे. या तालुक्यातील १५ लघुप्रकल्पांमध्ये आजमितीस केवह १0.५0 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ मालेगाव तालुक्याचा क्रमांक लागत असून, या तालुक्यातील सोनल या मध्यम प्रकल्पात केवळ ३.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, २१ लघुप्रकल्पांमध्ये १२ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पाणीटंचाई कृती आराखड्यातही या तालुक्यांना झुकते माप देण्यात आले.
४९१ विहिरींचे होणार अधिग्रहण!पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्हय़ातील ४९१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून, त्याद्वारे पाणी पुरविण्यात येईल.
वाशिम शहरात होतोय दहा दिवसाआड पाणीपुरवठाएकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ ३ दलघमी पाणी शिल्लक आहे. ते आगामी किमान सहा महिने पुरवावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पाणी कपातीचे धोरण अंगीकारण्यात आले असून, शहराला सध्या आठ ते दहा दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे.
७४ गावांमध्ये टँकरने होणार पाणीपुरवठाजिल्हय़ातील पाणीटंचाईग्रस्त ५१0 गावांपैकी ७४ गावांना टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ९१ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. -