लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार (वाशिम) : सन २०१६ मध्ये लोकसहभाग व सीएसआर फंडातून १९ लाख रुपये खर्चून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या डोहातून सद्या रस्त्याच्या कामासाठी बेसुमार पाणी उपसा केला जात आहे. यामुळे डोहातील पाणीपातळी प्रचंड प्रमाणात खालावल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईचे संकेत आहेत. ही बाब लक्षता घेवून डोहातील पाणी उपसा तत्काळ बंद करावा, अशी मागणी शेलुबाजार ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या डोहामध्ये अडाण नदीचे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे शेतशिवारांमधील जलस्त्रोतांची पाणीपातळी कायम राहण्यासोबतच गुरांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय झाली होती. मात्र, सद्या सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान रस्त्यासाठी आवश्यक ठरू पाहणारे पाणी याच डोहातून उपसले जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी डोह उघडा पडला असून भविष्यात भीषण पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविण्यता येत आहे. याकडे लक्ष पुरवून प्रशासनाने तत्काळ पाणी उपसा थांबवावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने ठरावाव्दारे केली. त्याची प्रत जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आली आहे.
‘जलयुक्त शिवार’च्या डोहातून रस्त्याच्या कामासाठी पाणी उपसा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 2:12 PM