- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासह समृद्धी मार्गाच्या कामांसाठी गौणखनिजांची पूर्तता करण्यासाठी शासकीय आणि खासगी जमिनींवर भव्य आकाराच्या १०९ शिवार तळ्यांची कामे करण्यात आली. या तळ्यांमुळे कोट्यवधी लिटरचा जलसाठा तयार होऊन जिल्ह्यात जलसमृद्धीच झाल्याचे स्पष्ट होत आहे.महामार्गांच्या कामातील गौणखनिजाची पूर्तता करताना जलसंधारणाची कामेही व्हावीत, असे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार ज्या ग्रामपंचायती व शेतकऱ्यांनी ठराव किंवा प्रस्ताव दिले. त्या ठिकाणाची पाहणी कृषि विभागामार्फत करण्यात आली व त्याठिकाणी उपलब्ध पाणलोट क्षेत्राचा विचार करून शेततळ्यांचा आकार ठरविण्यात आला. त्याची अंदाजपत्रके व प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले व जिल्हास्तर समितीची मान्यता, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासकीय आदेश आल्यानंतर शेतकरी, ग्रामपंचायत व संबधित कंत्राटदार तसेच तालुका कृषी अधिकाºयांदरम्यान नोंदणीकृत करार करून एकूण ११९ शिवार तळ्यांची कामे करण्यात आली.
कारंजा तालुक्यात ९० तळ्यांची कामे !कारंजा तालुक्यात समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून १५८ साठवण शिवार तळ्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ९० तळ्यांची कामे पूर्ण झाली असून, १२ तळ्यांची कामे सुरू आहेत. पावसाळा असल्याने तळ्यांची कामे थांबली असून, पावसाळा संपताच सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी सांगितले.
शासनाचा एक पैसाही न खर्च होता कोटींची कामेमहामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात सहा तालुक्यात मिळून ५० मीटर रूंद आणि ७० मीटर लांब, ३ मीटर खोल, तसेच १०० मीटर रूंद, १०० मीटर लांब आणि ३ मीटर खोल अशा भव्य आकाराची कोट्यवधी खर्च येणाºया १०९ तळ्यांची कामे शासनाचा एक पैसाही न करता पूर्ण झाली.
४९६ कोटी लिटर जलसाठा४जिल्ह्यात समृद्धी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी जी शिवार तळे खोदण्यात आली. वर्षभरात हे तळे भरल्यास तब्बल ४९६ कोटी लिटरचा जलसाठा उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत यातील ९० पेक्षा अधिक तळे पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे संबंधित परिसरातील भूजल पातळीतही लक्षणीय वाढ झाली असून, तळ्यातील पाण्याचा शेतकºयांना फायदा होणार आहे.
समृद्धी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या १०९ साठवण तळ्यांमुळे जिल्ह्यातील भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. शिवाय कोट्यवधी लिटरचा जलसाठाही निर्माण झाला असून, लाखो ब्रास गौणखनिजाची पूर्तताही होऊ शकली आहे.- एस. एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी