लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रिसोड तालुक्यातील पिंपरखेड शेतशिवारातील १० एकर शेतात सिंचन तलावाचे पाणी घुसल्याने सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त होऊन शेतकºयाचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेले नुकसानग्रस्त शेतकरी अशोक विठोबा वाठोरे यांनी या संदर्भात ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.रिसोड तालुक्यातील पिंपरखेड शेतशिवारात अशोक वाठोरे यांची ३ हेक्टर २० आर म्हणजेच जवळपास १० एकर शेती आहे. या संपूर्ण शेतीत त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. सुरुवातीच्या चांगल्या पावसामुळे हे पीक बहरले. हे पीक शेंगा फुलावर असताना आॅगस्ट महिन्यात आलेल्या जोरदार पावसामुळे शेतशिवारालगत असलेल्या एकलासपूर सिंचन तलावात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आणि या तलावाचे पाणी अशोक वाठोरे यांच्या शेतात घुसले. त्यामुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त होऊन त्यांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणने आहे. या शेतीशिवाय त्यांच्याकडे उदर निर्वाहाचा दुसरा पर्याय नाही. त्यामुळे ते चिंताग्रस्त झाले असून, या नुकसानापोटी २ लाख रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे ३ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
सिंचन तलावाचे पाणी घुसले शेतात; १० एकरातील पिक उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 3:48 PM