वाशीम : दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्या वाचून पक्षांची होणारी तळमळ थांबावी याकरिता वाशीम येथील निसर्गप्रेमी सावली प्रतिष्ठानने अभिनव उपक्रम हाती घेतला असून शहरातील निर्जळ व दाट झाडे व पक्षांचा राबता असलेल्या विविध ठिकाणी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो पाणवठे या निसर्ग प्रेमींनी निर्माण केले आहेत. यामुळे पक्षांना त्याची वस्ती असणाऱ्या ठिकाणी पाणी उपलब्ध होऊन त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे. वाशीम येथील सावली प्रतिष्ठान या निसर्ग व्यासंगी गृपच्यावतीने दिवसेंदिवस होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे प्रदूषण आणि जागतिक उष्मांकाचा आकडा वाढत असल्यामुळे अनेक पक्षी दुर्मिळ होत चालले,अनेक पक्षी आणि प्राणी मात्रांचे जीवन धोक्यात आलेत म्हणून निसर्गाशी व प्राणीमात्रांविषयी जवळीक साधून निर्सग व्यासंगी मंडळींनी पुढे येवून या संकटाचा वेळीच सामना करणे अत्यंत करणे गरजेचे आहे. भविष्यात चिमणी हा प्राणी कसा असतो हे सांगण्याची वेळ येवू नये म्हणून सावली प्रतिष्ठानच्यावतीने विविध पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे आयोजन गत काही वर्षापासून करण्यात येत आहे. पक्ष्यासाठी पाणपोई हा उपक्रम शहरात राबविण्यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी साहित्य जमा करण्यासाठी टाकाऊ वस्तुंचा वापर केला, त्यामध्ये रेल्वे स्थानकावर फेकून दिलेल्या रिकाम्या पाण्याच्या बॉटल्स जमा करण्यात आल्या ,शेतातील साधारण: सुकलेल्या तुरीच्या खोडक्या जमा करुन त्यापासून तिपाई तयार करण्यात आली, जेवढे पाणी कमी झाले तेवढाच पाण्याचा पुरवठा मातीच्या भांड्यात होण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले. भांडयातील पाणी जास्तीत जास्त टिकण्यासाठी सी.एस.एल. या तंत्राचा वापर प्रत्येक पाणपोईला करण्यात आला आहे.
निसर्ग व्यासंग वृध्दिंगत होउन पर्यावरण संवर्धन चळवळीला गती देण्यासाठी सावलीने बच्चे कंपनीला सहभागी करून निसर्ग व्यासंगाचे बाळकडूच दिले आहेत. बच्चे कंपनी देखिल या उपक्रमाचा नैसर्गिक आनंद घेत आहेत. आजवर आपल्या घरात वावरायची अंगणात धान्य निवडताना चार दाणे टाकले की पक्षाचा थवा हमखास तो टिपायला जवळ यायचा आणि भुर्रकन उडूनही जायच्या अंगणात घराच्या आडोशाला अगदी भिंतीवर टांगलेल्या फोटोंच्या मागे पक्षी घरटे सहज तयार व्हायचे असे मात्र आता कुठेही दिसत नसल्याचे चित्र आहे. मुक्या जीवांची तृष्णातृप्ती करण्यासाठी नागरीकांनी पानवठ्यात पाणी भरण्याचे आवाहन सावली प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे.