मंगरुळपीर: नगर पालिका प्रशासनाच्यावतीने गेल्या ३५ वर्षांपूर्वी शहरवासियांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्प कुचकामी ठरत आहे. हा प्रकल्प निष्क्रीय झाल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून शहरवासियांना गढूळ पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मंगरुळपीर शहरातील ४० हजारांहून अधिक जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी शहरातील मानोली मार्गावर मोठमोठे जलकुं भ उभारण्यात आले. या जलकुंभात मोतसावंगा धरणातून येणारे पाणी भरून ते पाणी शुद्ध करण्यासाठी त्याच ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्पही सुरू करण्यात आला. गेली अनेक वर्षे शहरवासियांना या प्रकल्पामुळे शुद्ध पाणी मिळत होते; परंतु गेल्या दीड महिन्यापासून हा प्रकल्प निष्क्रीय झालेला असून, शहरवासियांना मोतसावंगा धरणातून येणारे पाणी जसेच्या तसे सोडण्यात येते. सध्या पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे पाण्यात धरणातील गाळही येत आहे. हे गढूळ पाणी पिण्यात येत असल्याने नागरिकांना भीषण आजार जडण्याची भिती आहे. पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे.