इंझोरी, दि. 2 - यंदा अल्प पावसामुळे जिल्हाभरातील जलसाठ्यात वाढच झाली नाही. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अडाण नदीच्या पात्रात केवळ फुटभर पाणी आहे. सर्वच नद्या, तलावांची हिच स्थिती असल्याने यंदा गणेश विसर्जन करावे कोठे, असा प्रश्न गणेशभक्तांसमोर उपस्थित झाला आहे.
यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला आहे. मधल्या काही दिवसांत तुरळक पाऊस पडल्याने खरिपाच्या पिकांना आधार झाला असला तरी, नद्या, तलाव, विहिरींच्या जलसाठ्यात किंचितही वाढ झाली नाही, उलट पाणी पातळी खोल गेली आहे. आता येत्या दोन दिवसांत सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी होणार असताना श्रींना निरोप द्यावा कसा, असा प्रश्न गणेशभाविकांना पडला आहे. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदी पात्रात कारंजा तालुक्यासह मानोरा तालुक्यातील काही गावांमधील गणेश मंडळांकडून गणेश विर्सजन करण्यात येते.
ऑगस्ट महिन्यात या नदीचे पात्र काठोकाठ भरलेले असते. त्यामुळे कारंजा आणि मानोरा तालुक्यातील गणेश मंडळांकडून बाप्पांना निरोप देण्यात अडचण येत नाही; परंतु यंदा अत्यल्प पावसामुळे हे नदी पात्र आटले आहे. पात्रातील मध्यभागात केवळ फुटभर पाणी वाहताना दिसते. या पाण्यात विसर्जन करून श्रींना निरोप द्यावा तरी कसा, असा प्रश्न गणेश मंडळांना पडला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पर्याय शोधला जात असल्याची माहिती आहे.