रिसोड येथील जलसंपदा विभागाअंतर्गत २२ कर्मचारी पदे असताना अवघ्या चार कर्मचाऱ्यांवर कारभार चालविला जात असल्याने अनेक सिंचन तलावांची दयनीय अवस्था आहे. याचा कालवा लाभक्षेत्रातील वसुलीवर विपरीत परिणाम होत आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्या जिल्हा दौऱ्याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील जलसंपदा विभागाअंतर्गत आठ तलाव आहेत. यामध्ये मोरगव्हाण, जवळा, मांडवा, गौढाळा, धोडप, करडा, गणेशपूर, पाचांबा या तलावांचा प्रामुख्याने समावेश येतो. यंदा मुबलक पाऊस पडल्याने बहुतांश तलाव तुडुंब भरले. परंतु अनेक तलावांची पाहणी करता संबंधित विभागाकडे कर्मचारी वर्गाची वानवा दिसून येत आहे. अनेक तलावांचे रस्ते अतिक्रमणात अडकले आहेत. अनेक तलावांच्या भिंतीला जंगलाचे स्वरूप आल्याने रानडुकरांचा त्रास वाढला, तर अनेकदा शेतकऱ्यांवर रानडुकरांचा हल्ला झाला. मोरगव्हाण सिंचन तलावाच्या कालव्यांची पार दुरवस्था झाल्याने मोरगव्हाण तलावातील पाणी शेलू खडशे व्हाया एकलासपूर तलावामध्ये जात आहे. सदर विभागाच्या कार्यालयातील २२ ऐवजी अवघे ४ कर्मचारी असल्याने पाणी करवसुलीसाठी अनेक अडचणी येत आहेत. यासाठी जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्या दौऱ्याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागलेले आहे.
येथील कार्यालयामध्ये एकूण बावीस कर्मचारी आहेत. परंतु तालुक्यातील जलसंपदा विभागाअंतर्गत सिंचन तलावाची जबाबदारी अवघ्या चार कर्मचाऱ्यांवर आल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागतो. पर्यायाने पाणी करवसुली तलावांच्या देखरेखीचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
- आर. एस. कळासरे, शाखा अभियंता, जलसंपदा विभाग रिसोड