दरवर्षी उन्हाळा सुरू होताच मानोरा तालुक्यातील कायम टंचाईग्रस्त राहणाऱ्या काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो; मात्र गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने व परतीचा पाऊसही दमदार स्वरूपातील झाल्याने लघू, मध्यम प्रकल्प शंभर टक्के तुडूंब भरली होती. यामुळे यंदा जलसाठा पुरेशा प्रमाणात होता. जमिनीखालील पाणीपातळीदेखिल यावर्षी त्या तुलनेत कमी झाली नाही.
गतवर्षी तालुक्यातील १८ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. १५ गावांमधील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या; तर तीन गावांमध्ये टॅंकरने पाणीपाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यंदा मात्र मे महिना संपत आला असताना एकाही गावात अद्यापपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासंबंधीचा एकही प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झालेला नाही.
पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार आसोला, शेंदोना, गोस्ता, धावंडा, बालाजीनगर, पाळोदी, रणजीतनगर, सावरगाव, वडगाव, उज्वल नगर, गलमगाव, धानोरा बु., हातोली, खापरी खंडाळा, शेंदुरजना या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे.
...................
तीन ठिकानी विहीर अधिग्रहण
मानोरा तालुक्यातील तीन ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले असून एकूण १५ प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एका प्रस्तावात त्रुटी असून पुर्ततेसाठी परत पाठविण्यात आला आहे. एक प्रस्ताव पुर्नरिक्षण करून कार्ली ग्रामपंचायतकडे पाठविण्यात आला.
.............
गतवर्षी १५ गावांमध्ये विहीर अधिग्रहण
चालूवर्षीच्या तुलनेत गतवर्षी पाणीसमस्या अधिक प्रमाणात होती. १५ मे २०२० पर्यंत १५ ठिकाणी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या; तर तीन गावांमध्ये टॅंकर सुरू करण्यात आले होते. यावर्षी मात्र फारशी पाणीटंचाई नसल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
...................
कोट :
गतवर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने चालूवर्षी मानोरा तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गंभीर झालेले नाही. असे असले तरी टंचाईग्रस्त गावांपैकी ज्या गावांमध्ये गरज आहे, त्याठिकाणी विहीर अधिग्रहण करून उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत टॅंकर सुरू करण्यासंबंधीचा एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.
- जयश्री वाघमारे
गटविकास अधिकारी, पं.स., मानोरा