लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात अपुºया पावसामुळे ११० प्रकल्पांची पातळी अद्यापही शुन्यावर असताना विहीरी, कूपनलिका आणि गावतलावांची स्थितीही गंभीर आहे. त्यामुळेच अद्यापही अनेक गावांत पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. वाशिम जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांच्या निर्मितीपूर्वी प्रामुख्याने विहिरी आणि गावतलावांचा पाण्यासाठी वापर होत असे. सिंचन प्रकल्पांची संख्या वाढत गेल्यानंतर विहिरी, गावतलावासारख्या पारंपरिक जलस्त्रोतांकडे दुर्लक्षही झाले. त्यामुळेच या जलस्त्रोतांची अवस्था गंभीर झाली असून, त्यांची पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. वाशिम जिल्ह्यात खासगी आणि शासकीय मिळून एकूण ३४ हजार ६५५ विहिरी आहेत, तर गावतलावांची संख्याही हजाराच्या जवळपास आहे. गत काही वर्षांत या जलस्त्रोतांकडे दुर्लक्ष झाल्याने बुजलेल्या जलस्त्रोतांची साठवण क्षमताच कमी झाली असताना पावसाचे प्रमाणही कमी होत गेल्याने या जलस्त्रोतांमुळे भुगर्भातील पाणी पातळी टिकविण्यासाठी होणारा आधारही कमी झाला आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने हे पारंपरिक जलस्त्रोत्र पूर्णपणे कोरडेच आहेत. विविध गावांतील गावतलावांची स्थिती गंभीर असल्याने आगामी काळात गुरांच्या पाण्याचा प्रश्न खुपच गंभीर होणार असून, विहिरी व कूपनलिकांची पातळीही वाढली नसल्याने जनतेलाही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे.
पाणीटंचाई कायमच; गावतलाव कोरडे: विहिरी, कूपनलिकांतही अल्पसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 6:19 PM