वाशिम - जिल्ह्यातील पांगरखेडा (ता.मालेगाव) या पुनर्वसीत गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतशिवारांमधील विहिरींना पाणी आहे; परंतु शेताला दैनंदिन ६ ते ७ तासच विज मिळत असल्याने महिलांना खोल गेलेल्या विहिरींमधील पाणी दोर व बकेटने काढावे लागत असल्याने त्यांचा जीव धोक्यात सापडत आहे. जिल्हा प्रशासनाने यंदा साडेचार कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला. ५५० गावांमध्ये याअंतर्गत उपाययोजना राबविण्याची बाब प्रस्तावित करण्यात आली. असे असताना पांगरखेडा या गावात प्रशासनाचे पाणी मात्र अद्याप पोहचलेच नाही. गावात २४ तास विज असते; पण पाणी नाही आणि शेतशिवारांमधील विहिरींना पाणी आहे; तर त्याठिकाणी केवळ ६ ते ७ तासच विज उपलब्ध राहत असल्याने गावकºयांना ती वेळ साधत ३ ते ४ किलोमिटर पायपीट करत पाण्याची गरज भागवावी लागत आहे. खोलवर गेलेल्या विहिरींमधून दोन व बकेटने पाणी काढत असताना कधीकाळी कुणाचा पाय घसरून विहिरीत पडल्यास जीवालाच मुकावे लागणार असल्याची बिकट परिस्थिती उद्भवली असताना प्रशासनाला त्याचे कुठलेच सोयरसुतक राहिले नसल्याने गावकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पुनर्वसित पांगरखेड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य! खोलवर विहिरीतून उपसावे लागतेय पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2018 2:23 PM