लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, ग्रामीण भागातील जनतेची पाण्यासाठी कोसो दूर भटकंती होत आहे. असे असताना आतापर्यंत केवळ ७ गावांमध्ये टँकर सुरू झाले असून, २६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, तालुकास्तरावरून टँकर मागणीचे प्रस्ताव पाठविण्यास विलंब होत असल्यानेच ही स्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या पर्जन्यमानात सरासरी ३० टक्के घट झाली. जिल्ह्यातील पैनगंगेवरील बॅरेजेसचा अपवाद वगळता इतर मध्यम व लघू असा एकही प्रकल्प या पावसामुळे तुडुंब भरलेला नव्हता. याशिवाय विहिरी, हातपंप, कूपनलिकांची पाणी पातळीही समाधानकारक वाढली नाही. त्यामुळे चालू वर्षी लवकरच पाणीटंचाई उद्भवली आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डिसेंबर २०१७ मध्येच ५१० गावांचा संभाव्य कृती आराखडा तयार करून ५७८ उपाययोजना आखल्या होत्या. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र मार्च महिन्यात होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ मार्चअखेर जिल्ह्यातील बाभूळगाव, काकडदाती (ता. वाशिम), उज्वलनगर, जनुना खुर्द, गलमगाव (ता. मानोरा) आणि गिर्डा, धोत्रा देशमुख (ता. कारंजा) या सात गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय २६ गावांमधील विहिरी आणि कुपनलिका अधिग्रहित करून त्याद्वारे टंचाईग्रस्त गावांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली, त्या गावांनी जिल्हा प्रशासनाकडे टँकर मागणी प्रस्ताव सादर करावे. पाणी उपलब्धता आणि विहीर अधिग्रहण प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून संबंधित गावांना विनाविलंब पाणीपुरवठा केला जाईल. प्रशासनाकडूनही अशा पाणीटंचाईग्रस्त गावांची चाचपणी सध्या केली जात आहे. - शैलेष हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम