वाशिम : वाशिम जिल्ह्यात कधीकाळी ५०० च्या आसपास शेडनेट उभे होऊन त्याव्दारे शेतकरी संरक्षित शेती करायला लागले होते. मात्र, प्रतिकुल हवामान, तापमानात होत असलेली वाढ आणि भीषण पाणीटंचाईमुळे बहुतांश ठिकाणचे शेडनेट निकामी ठरल्याचे दिसून येत आहे.
वाशिम-शेलूबाजार मार्गावर विविध ठिकाणी शेतात शेडनेट उभारण्यात आलेले आहेत. मात्र, त्यात भाजीपाला अथवा इतर पिकांची लागवड करायची झाल्यास पाण्याची उपलब्धी आवश्यक असण्यासोबतच तापमानही ठराविक असणे अत्यावश्यक आहे. मात्र, सद्य:स्थितीत तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सियसवर पोहचले असून शेतशिवारांमधील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. यामुळे शेडनेटमध्ये पीक घेणे जवळपास अशक्य ठरत असल्याने लाखो रुपये खर्चून उभे करण्यात आलेले शेडनेट तसेच निकामी पडून असल्याचे दिसून येत आहे. अशातच अधूनमधून सुसाट्याचा वारा देखील सुटत असल्याने काही शेडनेट फाटून केवळ पाईपच शेतात उभे असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. या बिकट स्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले असून किमान यंदाच्या पावसाळ्यात तरी पर्जन्यमानाची टक्केवारी वाढून शेतशिवार हिरवेगार होतील, अशी अपेक्षा शेतकºयांना लागून आहे.