जिल्ह्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या १०४ टक्के पाऊस पडला. भरीसभर परतीच्या पावसानेही चांगलाच मुक्काम ठोकल्याने जिल्ह्यातील एकूण १३६ प्रकल्पांत मिळून ९३ टक्क्यांहून अधिक जलसाठा झाला. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात जनतेला पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार नाही, असे वाटू लागले. तथापि, प्रकल्पात जलसाठा वाढल्याने रबीचे क्षेत्रही वाढले. परिणामी, सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याने जिल्ह्यात आजमितीस तीन मध्यम प्रकल्प आणि १३४ लघु प्रकल्प मिळून ५५.३१ टक्के जलसाठा उरला आहे. त्यात १७ प्रकल्पांची पातळी ३० टक्क्यांपेक्षाही कमी असल्याने यंदाही जिल्ह्यात ३९२ गावांत पाणीटंचाईसदृश स्थिती आहे. ही पाणीटंचाई नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने ४२२ उपाययोजना प्रस्तावित केल्या असून, त्यासाठी ४ कोटी ९० लाख १७ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केला आहे.
-----
जिल्ह्यात वाशिम तालुका ‘डेंजर झोन’मध्ये
जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत यंदा वाशिम तालुका पाणीटंचाईच्या बाबतीत ‘डेंजर झोन’मध्ये आहे. या तालुक्यातील १० बॅरेज आणि २५ प्रकल्प मिळून यामध्ये आजमितीस ४७.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी तालुक्यातील ९० गावांत पाणीटंचाईसदृश स्थिती आहे. त्यावर नियंत्रणासाठी ४९ गावांत ५१ विहिरींचे अधिग्रहण, ३ गावांत ३ टँकर, १२ गावांत नळ योजना विशेष दुरुस्ती, तर २१ गावांत नवीन २९ कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजना कृती आराखड्यात प्रस्तावित आहेत. त्यासाठी अंदाजे १ कोटी १६ लाख १६ हजारांचा खर्च येणार आहे.
२८३ विहिरींचे होणार अधिग्रहण!
पाणीटंचाई कृती आराखड्यात पाणीटंचाईग्रस्त ३९२ गावांपैकी २७१ गावांकरिता जिल्ह्यातील २८३ विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार असून, अधिग्रहित विहिरीतील पाण्याआधारे टंचाईग्रस्त गावांतील लोकांची तहान भागविली जाणार आहे.
--------------
२२ गावांना होणार टँकरने पाणीपुरवठा
जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ३९२ गावांपैकी २२ गावांना टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी ३१ लाख ५० रुपये किमतीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
-------------
कृती आराखड्यातील उपाययोजना
उपाययोजना संख्या खर्च (लाखांत)
विहीर अधिग्रहण २८३ - ९५.०४
टँकर २२ - ३१.५०
नळ योजना दुरुस्ती ४२ - २९२.४३
तात्पुरती पु. नळ योजना ०८ - ५२.००
नवीन कूपनलिका ६७ - ४०.२०
-------------------------------------