लोकमत न्यूज नेटवर्ककरंजी (वाशिम) : प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींवरून नळाव्दारे पाणी मिळण्यास १२ ते १५ दिवसांचा विलंब लागत आहे. या समस्येला त्रासलेल्या महिलांनी अखेर शुक्रवार, २१ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून सरपंच, सचिवासह तलाठ्यास चांगलेच धारेवर धरले.करंजी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. गावातील सर्वच हातपंप नादुरूस्त आहेत. ही बाब लक्षात घेवून ग्रामपंचायतीने २० एप्रिल २०१९ पासून किसन खाडे, ज्ञानबा विढोळे, माधव लहाने यांच्या विहिरी अधिग्रहीत केल्या. त्यावरून नळ योजनेव्दारा पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो; मात्र पाण्याचे समसमान वाटप होत नसल्याने १२ ते १५ दिवस पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या समस्येला वैतागलेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून सरपंच सुरेश पाटील, सचिव व्ही.एस. नवघरे, तलाठी व्ही.एल. अवचार यांना धारेवर धरले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बबन लहाने, प्रदिप लहाने यांची उपस्थिती होती. दरम्यान, हातपंपांची दुरूस्ती करून पाण्याचे समसमान वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत ठराव घेवून हा प्रश्न निकाली काढेन, असे आश्वासन पदाधिकाºयांनी मोर्चेकरी महिलांना दिले. त्यानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेण्यात आले.
पाणीटंचाई; महिलांचा करंजी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 4:36 PM