मालेगाव : शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न पेटला असून काटेपूर्णा ते कुरळा पाइपलाइनचे काम आता सुरु झाले आहे. तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. तथापि, अद्याप टँकर सुरू झाले नसल्याने शहरवासियांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
तब्बल एक महिन्यापासून मालेगाव शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. आता पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे. मालेगाव शहरातील नळ योजना पाण्याअभावी बंद आहे. मालेगाव शहरात पाण्याचे दुसरे कोणतेही स्तोत्र उपलब्ध नाही त्यामुळे शहरातील नागरिकांच्या पाण्याची सर्व भिस्त आता विकत मिळणाºया टँकरच्या पाण्यावर आहे. शहरात तीस हजाराच्या जवळपास लोकसंख्या आहे. त्यातील पाच ते दहा टक्के लोकांजवळ बोअरचे पाणी उपलब्ध आहे. उर्वरीत नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. कारण पाणी विकत घेतल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. अशा स्थितीत खाजगी टँकरद्वारे पाणी विकत घेणाºया टँकरच्या गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. लहान मोठे टँकर हे पाणी विकण्यासाठी दिवस-रात्र रस्त्यावरून धावत असल्याचे दिसून येते. एक हजार लिटर पाण्यासाठी २५० रुपये तर पाच हजार लिटरच्या टँकरसाठी ८०० ते एक हजार रुपये मोजावे लागत आहेत. यापुढे शहरातील पाणी समस्या अधिक भीषण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी काही दिवसात पाणीपुरवठा करणाºया टँकरच्या दरातही वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शहरात तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे क्रमप्राप्त आहे. दरम्यान, पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी काही जणांनी उपोषण आंदोलन केले होते. यावेळी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप टँकर सुरू झाले नसल्याने पाणीटंचाईची तिव्रता अधिक वाढली आहे.
शहरात बांधकामे जोरात !
मालेगाव नगर पंचायतच्या हद्दित जवळपास २० बांधकाम जोरात सुरु आहेत. यावर नगर पंचायतचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. ही बांधकामे बंद केली तर पाण्याची बचत होऊ शकते. ही बांधकामे त्वरित बंद करावी अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.