लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत टंचाईग्रस्त गावे टंचाईमुक्त करण्याचे शासनाचे धोरण आहे. कारंजा-मानोरा मतदार संघातील टंचाईग्रस्त गावांचे पावसाळ्यापुर्वी आराखडे तयार करून मोठ्या प्रमाणात कामे करण्याचा प्रयत्न केला. या कामांमुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केले. तालुक्यातील ग्राम मोखड (पिंप्री) येथील कामांची पाहणी करताना ते बोलत होते.कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, सरपंच, उपसरपंच, जि.प.सदस्य मिना भोने व ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती. जलयुक्त शिवार अभियानामुळे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत असे सांगून पाटणी म्हणाले की पावसाळ्यापुर्वी कृती आराखडा तयार करून जलयुक्तची कामे मार्गी लावली आहेत. ग्रामीण भागातील नाल्याचे खोलीकरण, रूंदीकरणासोबतच पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरूस्ती, नुतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करून ज्या गावात तीव्र पाणी टंचाई आहे अशा गावात ताळेबंदानुसार पाण्याची गरज लक्षात घेता कार्यक्रम राबविण्यात आले. भविष्यात टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठा योजना उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचे मत पाटणी यांनी व्यक्त केले. यावेळी ६२ लाख रुपये किंमतीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गतच्या कामाला शुभारंभही करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गणेश इसळ यांनी केले. यावेळी अनिल कानकिरड, दिगंबर गोडसे, ज्ञानेश्वर ठाकरे, विजय गोडसे, गणेश ईसळ, गणेश राऊत, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी बोबडे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
जलयुक्त कामांमुळे पाणीटंचाई दूर होईल - आमदार राजेंद्र पाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 2:36 PM