--------------
पशू लसीकरणाची प्रतीक्षा
वाशिम : मानोरा पशू वैद्यकीय दवाखान्याकडून काही महिन्यांपूर्वी गुरांना लसीकरण करण्यात आले. तथापि, कारखेडा, तळप बु. आणि इतर गावांत अद्यापही ही मोहीम राबविण्यास सुरुवात झाली नाही. त्यामुळे पशुपालकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-------
पाइप लाइन नादुरुस्त
वाशिम : जीवन प्राधिकरणच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाइप लाइन लिकेज होऊन पाणी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. गुरुवारीही ही समस्या जाणवली. ही पाइप लाइन दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.
--------------
फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेलूबाजार : कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पेरणीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. शुक्रवारी कृषी सहायकांनी शेतमजुरांना टोकण पद्धतीने सोयाबीन पेरणीबाबत मार्गदर्शन केले.
^^^^
पोलीस पाटलांची पदे रिक्त
वाशिम : जिल्ह्यातील १५ पेक्षा अधिक गावांतील पोलीस पाटलांची पदे गत दोन वर्षांपासून रिक्त आहेत. ती भरण्यासंबंधी संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले असून त्यात अनसिंग येथील ग्रामस्थांना विविध महत्त्वाची कागदपत्रे व दाखले मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
----------
वाशिम-पुसद रस्त्याची अवस्था वाईट
दगड उमरा : वाशिम ते पुसद महामार्गावरील जांभरूण जहॉगीर फाट्यानजीक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करीत मार्ग काढावा लागत आहे. याच कारणामुळे या भागात अनेक अपघातही घडले आहेत.
-----------
नवनिर्मित पुलावर पाणी
वाशिम : मानोरा तालुक्यातील शेंदुरजना-मानोरा मार्गावरील देवठाणानजीक असलेल्या नव्या पुलाची उंची रस्त्याच्या तुलनेत कमी झाल्याने या ठिकाणी खड्डा पडून त्यात पाणी साचत आहे.
^^^^^
कामरगावात नाल्यांची सफाई
वाशिम : पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने गावात नाल्यांतील सांडपाण्यामुळे आरोग्याला असलेला धोका लक्षात घेत ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारपासून नाल्यांची सफाई सुरू करण्यात आली आहे.