वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील लाठी परिसरातून वाहणाऱ्या अडाण नदीच्या पात्रात रखरखत्या उन्हाळ्यात जीवंत पाणी साठा आढळला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या खोलीकरणाचा हा परिणाम असून, यामुळे शेलूबाजार परिसरातील गुरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याच मिटली आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार, लाठी परिसरातून वाहणाऱ्या अडाण नदीचे खोलीकरण दोन वर्षांपूर्वी लोकसहभागातून करण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील जलपातळीत मोठी वाढही झाली आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आणि गुरांनाही वर्षभर त्याचा आधार झाला. तथापि, गतवर्षी अपुरा पाऊस पडल्यामुळे यंदा या नदीचे पात्र कोरडे पडले. परिणामी शेत शिवारातील पातळी फारशी वाढली नाही आणि गुरांच्या पाण्याची समस्या तीव्र झाली. अशात या नदीच्या पात्रात खड्डा खोदून पाणी शोधण्याचा प्रयत्न काही ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केला. त्यांनी केलेला हा प्रयत्न फलद्रूप झाला आणि अवघ्या आठ फुट खोलीवरच या नदी पात्रात जिवंत पाणी साठा आढळला. त्यामुळे ग्रामस्थांनी २५ ते ३० फू ट लांब खड्डा खोदत नेला. आता या खड्ड्यातील पाण्यावर परिसरातील शेकडो गुरे आपली तहान भागविताना दिसत आहे. त्यामुळे पशूपालकांना पडलेली गुरांच्या पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे.