चौसाळा: पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे मानोरा तालुक्यातील चौसाळा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. या संदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले, तर ग्रामस्थांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. त्याची दखल प्रशासनाने घेत चौसाळ्याचा पाणी पुरवठा १ मार्चपासून सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती अखेर थांबली आहे.
मानोरा तालुक्यातील चौसाळा येथे अडाण प्रकल्पातून १६ गावे पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येतो. या योजनेची जलवाहिनी ठिकठिकाणी फुटल्यामुळे या योजनेचा पाणी पुरवठा बंद करून जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू करण्यात आले होते. त्यामुळे चौसाळ्याचा पाणी पुरवठा बंद झाला होता. त्यातच चौसाळा येथील चौसाळा आणि गारटेक हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आणि ग्रामस्थांना शेतशिवारात दोन किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत होते. चौसाळ्यातील ग्रामस्थांची समस्या लक्षात घेत लोकमतने २५ फेब्रुवारीच्या अंकात ‘पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम संथगतीने’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर ग्रामस्थांनी मानोराच्या तहसीलदारांना निवेदन सादर करून पाणी पुरवठा सुरू न केल्यास ५ मार्च रोजी कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा दिला. लोकमतने या संदर्भातही पाणीटंचाई निवारणासाठी चौसाळ्याचे ग्रामस्थ आक्रमक या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. अखेर प्रशासनाने दखल घेत जलवाहिनीचे काम त्वरीत करू न घेत १ मार्चपासून चौसाळ्यातील पाणी पुरवठा सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होत असलेली पायपीट थांबली आहे.