शिरपूर जैन : पाटबंधारे विभागाचे देयक थकल्याने ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून शिरपूर येथील पाणी पुरवठा ठप्पच असून, ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे थकीत करवसुलीसाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी घरोघरी फिरत आहेत.
शिरपूर जैन येथे अडोळ प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अडोळ प्रकल्पाचे शिरपूर ग्रामपंचायतीकडे चार ते पाच लाख रुपये पाणी बिल थकीत झाले. पाटबंधारे विभागाने शिरपूर ग्रामपंचायतीला पाणी बिल भरण्यासाठी वेळोवेळी सूचनाही दिल्या. तथापि, ग्रामपंचायतीने पाणी बिल भरण्यास टाळाटाळ केली. त्यातच ऑगस्ट महिन्यापासून १६ फेब्रुवारीपर्यंत शिरपूर ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नियुक्त होते व कोरोना काळात ग्रामपंचायत कामकाज चालविण्यासाठी आवश्यक कर वसुली यंत्रणा करू शकली नाही. त्यामुळेही थकीत पाणी बिल भरणे ग्रामपंचायतीला शक्य झाले नाही. परिणामी पाटबंधारे विभागाने महावितरण कार्यालयाला पत्र देऊन शिरपूर पाणी पुरवठा योजनेचा अडोळ प्रकल्पावरील वीज पुरवठा खंडित करण्यास भाग पाडले. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून शिरपूर येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शिरपूर येथील पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे होते. नुकतीच १६ फेब्रुवारी रोजी शिरपूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. आता लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सरपंच, उपसरपंच प्रयत्न करतील, अशी अपेक्षा गावकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी सरपंच, उपसरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे. आता तत्काळ पाणीटंचाईची समस्या निकाली काढू व गावातील पाणी पुरवठा सुरळीत करू.
- असलम परसुवाले, उपसरपंच ग्रामपंचायत, शिरपूर जैन.