लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : येथील पाणीटंचाईची तीव्रता वाढलेली असतानाही, टँकरचा प्रस्ताव धूळ खात पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २२ मे रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची तातडीने दखल घेत टँकरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानुसार २४ मे पासून टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला.गत काही वर्षांपासून राजुरा येथील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता मार्च महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी मे महिना संपत आला, तरी टँकरने पाणीपुरवठा सुरू होत नव्हता. गावात जलस्रोत नसल्याने दूरवरून गावकऱ्यांना पाणी आणावे लागते. रात्री-अपरात्री जागून पिण्याचे व वापराचे पाणी आणण्यासाठी लहान बालकांपासून ते आबालवृद्धांना कसरत करावी लागते. मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट सुरू होती. ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने टँकरचा प्रस्ताव तहसीलकडे दाखल करण्यात आला. मात्र, या प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण देत हा प्रस्ताव गत तीन महिन्यांपासून धूळ खात पडला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गावातील सामाजिक कार्यकर्ते मनीष दत्तराव मोहळे, यशवंत हिवराळे, शिवा वामनराव खराटे आदींनी २० मे रोजी तहसीलदार राजेश वझिरे यांची भेट घेऊन आपबिती कथन केली तसेच ‘लोकमत’ने २२ मे रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत तहसीलदार वझिरे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून टँकरचा प्रस्ताव निकाली काढला. त्यानुसार २४ मे रोजी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. एका विहिरीत टँकरचे पाणी टाकले जात आहे. टँकर सुरू होण्यासंदर्भात ‘लोकमत’चा पाठपुरावा फळास आला आहे. तलावाचा प्रश्न रखडलेलाच!राजुरा येथील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नजिकच्या नदी पात्रातील वाघडोह किंवा तवली नामक शेतशिवारातील सर्वेक्षण झालेल्या तलावाचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. इतरही ठिकाणी छोटे-छोटे तलाव, मातीबांध, सिमेंट बंधाऱ्याच्या कामासह जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यासाठी राजकीय पुढारी, अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गावकऱ्यांना अपेक्षित आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी राजुऱ्यातील पाणीटंचाईची दाहकता कमी होणार नाही.
राजुरा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू!
By admin | Published: May 25, 2017 1:46 AM