तालुक्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून अठ्ठावीस गावे पाणीपुरवठा योजना कार्यन्वित आहे. सुरुवातीला अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असल्यामुळे रस्ता कामात पाईप फुटण्याच्या कारणावरून योजना बंद राहायची. यात संपूर्ण दोन वर्ष गेले. या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले तरी सुध्दा ही नळ योजना पूर्ण सुरळीत झाली नाही. आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा ठप्प असतो. सध्या पाणीपुरवठा योजना बंद आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकाना शेतीचे कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षित आहे.
०००
दूषित पाण्यामुळे आजार उद्भवण्याची शक्यता
२८ गावे पाणीपुरवठा योजना बंद असल्याने, अनेक दिवसांपासून पाण्याचा उपसा नसलेल्या विहिरीचे दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अठ्ठावीस गावे पाणीपुरवठा योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांना पाण्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था कोणतीच नाही. दूषित पाण्यामुळे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ गावे पाणीपुरवठा योजना पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.