वाशिम : पाणीटंचाई निवारणार्थ काही गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजूरी नसल्याने गावक-यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार आहे. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. परंतू, विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती तसेच जिल्हास्तरीय यंत्रणकडे प्रस्ताव येत नसल्याची माहिती समोर येत आहे तर काही ठिकाणी प्रस्ताव सादर करूनही मंजूरी मिळत नसल्याची माहिती आहे. पाणीटंचाई संदर्भात जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेतही सदस्य, पदाधिका-यांकडून प्रश्न उपस्थित केले जातात. काही प्रश्नांची सोडवणूक केली जाते तर काही प्रश्न प्रलंबितच राहतात. गोलवाडी व निंबी येथील मागासवर्गीय वस्ती, मथूरा तांडा येथे पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मंजूरी द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली होती. पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. परंतू, अद्याप मंजूरी मिळाली नसल्याची माहिती आहे. गोलवाडी येथील मागासवर्गीय वस्तीत पाणीपुरवठ्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तेथे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. निंबी येथील मागासवर्गीय वस्ती तसेच मथूरा तांडा येथेही पाणीपुरवठा योजना नसल्याने घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपिट करावी लागत आहे.
पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 3:59 PM