लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील ग्रामीण भागांत पाणीटंचाईचे संकट उग्र रूप धारण करीत असताना मानोरा तालुक्यातील तोरणाळा येथील मुख्य रस्त्यावर गेल्या ३ दिवसांपासून जीवन प्राधीकरणची जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. रस्त्यावर पाण्याचा पाट वाहत असतानाही जीवन प्राधीकरणच्या अधिकाºयांचे मात्र दुर्लक्ष आहे.वाशिम जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक गावांत सद्यस्थितीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घडाभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात ग्रामस्थांची पायपीट सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागांत सर्वत्र पाहायला मिळत आहे. या पाणीटंचाईवर उपाय म्हणून प्रशासनाने विहिरींचे अधीग्रहण केले, तर ५० पेक्षा अधिक गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दुसरीकडे अडाण प्रकल्पामुळे मुबलक पाणी पुरवठा होत असलेल्या गावांत मात्र पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मानोरा तालुक्यातील तोरणाळा येथे जिवन प्राधीकरणच्या पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी फुटल्याने हा प्रकार घडत असून, गेल्या तीन दिवसांपासून गावातील मुख्य रस्त्यावर पाण्याचा पाट वाहत असल्याने हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तथापि, जलवाहिनीची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबविण्याचा प्रयत्न जिवन प्राधीकरणच्या अभियंत्यांकडून अद्यापही करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे सतत पाणी वाहत असल्याने रस्त्यावरही चिखल तयार झाला असून, ग्रामस्थांना या मार्गावरून येजा करण्यातही अडचणी येत आहेत.
पाण्याचा अपव्यय; मजीप्राचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 5:07 PM