मालेगाव : शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीच्या बळावर टरबुजाचे पीक उभे केले. या प्रयोगात जिल्ह्यातील शेतकरी यशस्वी झाले. मात्र शेतमाल काढणीच्या सुमारास कडक निर्बंध लागू असल्याने टरबूज उत्पादकांची कोंडी झाली आहे. बाजारपेठ नसल्याने लाखोंचे पीक सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात टरबूज लागवड केली. अल्पावधीत हातात येणारे पीक म्हणून टरबुजाच्या लागवडीकडे पाहिले जाते. अधिक खर्चिक पीक असल्याने मोजकेच शेतकरी या पिकाकडे वळतात. यानंतरही शेतकऱ्यांनी दांडगी हिंमत दाखवित पिकांची लागवड केली. यावर्षी या पिकाला शेतकऱ्यांना एकरी लाख रुपयांचा खर्च आला. त्यातही उन्हाच्या पाऱ्यामुळे आणि वातावरण अभावी उत्पादनात मोठी घट आली. या परिस्थितीत पूर्णवेळ उघडी असणारी बाजारपेठ कोरोनामुळे बंद पडली. या बंदचा शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला. लाखोंचे पीक तयार असताना मार्केट बंद असल्याने हे पीक जागीच सडण्याची भीती निर्माण झाली आहे. मार्केट नसल्याने प्रचंड मेहनत घेतलेले आणि लाखो रुपये खर्ची घातलेले शेतकरी अडचणीत आले आहेत. व्यापारी टरबूज खरेदी करायला तयार नाहीत. यातून शेतकऱ्यांच्या अडचणी
वाढल्या आहेत . गतवर्षीप्रमाणे यावर्षीही टरबुजाचे पीक वाया जाण्याचा अधिक धोका वाढला आहे.