वाशिम : जनावरांचे ईअर टॅगिंग (कानावर शिक्के) असल्याशिवाय १ जून नंतर कोणत्याही जनावराची खरेदी-विक्री करता येणार नाही. ५ मे पर्यंत जिल्ह्यात साधारणत: ७० टक्के पशुपालकांनी जनावरांचे ईअर टॅगिंग केले असून, उर्वरीत ३० टक्के पशुपालकांनीदेखील जनावरांचे ईअर टॅगिंग करावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने केले.
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत. ही प्रणाली पशुधनासाठी सर्व प्रकारचे ईअर टॅगिंग रेकॉर्ड करणार आहे. परिणामी, जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध, लसीकरण, वंध्यता उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीचा तपशील यासारखी माहिती शासनाकडे राहणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांचे ईअर टॅगिंग करण्याची मोहिम सुरू आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ‘कानावर शिक्के’ असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री, उपचार केले जाणार नाहीत. जिल्ह्यात २०१९ च्या पशुगणनेनुसार ४ लाख ९१ हजार ६७४ जनावरे आहेत. आतापर्यंत जवळपास ७० टक्के जनावरांचे ईअर टॅगिंग करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकरी, व्यापाऱ्यांनी आपल्या जनावरांचे इअर टॅगिंग करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले.