वाशिम : राज्यासह देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डबल मास्क हा प्रभावी उपाय असून, डबल मास्क घाला आणि कोरोना टाळा, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
वाशिम शहरासह जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि हात वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून डबल मास्कचा वापर करण्याचा सल्लाही आरोग्य विभागाने दिला आहे. दोन मास्क घातल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. दोन मास्क नेमके कसे, कुठे आणि कधी घालावे, याबाबतही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.
००००
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मास्क हाच प्रभावी पर्याय
कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी मास्क हा प्रभावी पर्याय आहे. दोन मास्क घालून कोरोना विषाणू संसर्गापासून स्वत:चा बचाव करता येऊ शकतो. कोरोनापासून संरक्षणासाठी केवळ कपड्याचा मास्क वापरणे प्रभावी ठरत नाही. पण जर तुम्ही कपड्याच्या मास्कसोबत सर्जिकल मास्क वापरलात तर तो फार प्रभावी ठरतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होते.
००००००
मास्क कसा वापरावा?
डबल मास्क हा तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित आहे की नाही याची काळजी घ्यावी. जर तो योग्यरीत्या बसत नसेल तर तो कोरोनाचे विषाणू सहज तुमच्या शरीरात शिरकाव करु शकतात, त्यामुळे ते धोकादायक ठरते. दोन मास्क घातल्याने तुमचा कोरोनाच्या प्रादुभार्वापासून बचाव होऊ शकतो.
पहिल्यांदा सर्जिकल मास्क घाला. त्यावर कपड्याचा मास्क वापरा. जेणेकरून सर्जिकल मास्क ड्राॅप्लेट इन्फेक्शनपासून बचाव करतो. तर कपड्याचा मास्क तो व्यवस्थित फिट ठेवण्यास मदत करतो. मास्क नेहमी बदलत राहावे. एकच एक मास्कचा वापर करू नये.
००००
हे करा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्जिकल मास्क फोल्ड करावा. त्यानंतर दोन्ही कानाच्या बाजूला त्याला छोटीशी गाठ बांधा. चांगल्या प्रतीचा मास्क खरेदी करा. तुमचे नाक, तोंड, पूर्णपणे झाकले जाईल, असाच मास्क वापरा. पहिल्यांदा सर्जिकल मास्क आणि त्यानंतर कपड्याचा मास्क वापरावा.
डॉ. अनिल कावरखे
जिल्हाध्यक्ष, आयएमए
०००
हे करू नका
डबल मास्क घालतेवेळी दोन्हीही सर्जिकल मास्क वापरू नये. मास्क कधीही शेअर करू नका. मास्क काढल्यावर हात अवश्य सॅनिटाईझ करा. एकाच मास्कचा वारंवार वापर करू नका. लहान मुलांनी शक्यतोवर दोन मास्क लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी दोन मास्कचा वापर करावा.
- डॉ. सचिन पवार
एम.डी. मेडिसीन वाशिम