-लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गत पाच दिवसांपासून पश्चिम वºहाडात दिवसा उन्हाचा कडाका, तर रात्री थंडी वाढत आहे. या विपरीत वातावरणामुळे तुरीचे पीक संकटात सापडले आहे. या वातावरणात फुले गळण्यासह किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांनी बेजार केले आहे. मान्सून विलंबाने दाखल झाल्याने पेरणीला उशीर झाला, तर पावसाने खंड दिल्याने पिके संकटात सापडून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आॅगस्ट आणि सप्टेंबरच्या पावसाने पिकांना तारले. उडीद, मूग काढणीवर असताना आलेल्या पावसामुळे या पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर शेतकरी उसंत घेत नाही तोच, सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने तांडव घालत शेतातील उभ्या सोयाबीनसह काढून ठेवलेल्या सोयाबीनचा सत्यानाश केला. या संकटातून शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करीत असून, त्यांच्या आशा आता खरिपातील दीर्घकालीन पीक असलेल्या तुरीवर लागल्या आहेत. हे पीक शेंगा, फुलांवर असताना वातावरणातील बदल या पिकासाठी घातक ठरत आहे. दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री पडणारी थंडी या पिकासाठी घातक ठरत आहे. प्रामुख्याने पश्चिम वºहाडातील हे वातावरण या पिकासाठी अधिकच धोकादायक ठरत आहे. या भागात सोयाबीननंतर सर्वाधिक क्षेत्र हे तुरीच्या पिकाचेच आहे. त्यामुळे या पिकावर शेतकºयांचे लक्ष लागले आहे. या वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणारी हिरवी अळी, पाने, फुले गुंडाळणारी अळी, बड विव्हिल, पिसारी पतंग, फुलकिडे, मावा आदी किडींचा प्रादुर्भाव होत आहे. या किडीवर नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी करणे, हाच पर्याय असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. सध्याच्या वातावरणामुळे तुरीवर शेंगमाशी, शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, बड विव्हिल आदी किडींचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावी.-भरत गीते,कृषी शास्त्रज्ञपं.दे.कृ.वि., अकोला.