कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जरी लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद पडले, अनेक व्यवसाय डबघाईस आले. त्यात दुसऱ्या लाटेने कहरच केला. पहिल्या लाटेतील लॉकडाऊनच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत बरीच शिथिलता असली तरी कोरोनाच्या दहशतीचाच व्यवसायावर परिणाम झाला. दुसरी लाट आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याने शासनाने अनेक व्यवसाय सुरू केले आहेत. निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल केले आहेत, परंतु अद्यापही सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमांवर अनेक मर्यादा कायम आहेत. प्रशासनाने या वर्षीही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश दिल्याने मंडप डेकोरेशनच्या व्यावसायिकांना पुन्हा आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
०००००००००००००
नियमांमुळे गणेश मंडळांनाही अडचणी
प्रशासनाने गणेशमूर्तीची उंची आणि आरतीबाबत मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे गणेश मंडळाकडून छोट्या मूर्तींंना पसंती देण्यात आली आहे. अनेकांनी जास्त तामझाम न करता मंडळात श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला असून, नेहमीप्रमाणे भव्य मंडप, लाईटची सजावट, मंच उभारता आले नसल्याने मंडप व्यावसायिक व कारागिरांचे आर्थिक नुकसान झाले आहे.