..............
वाहतूक ठप्प; एसटी प्रवाशांची गैरसोय
मेडशी : रविवारी दुपारच्या सुमारास दोन वाहनांचा किरकोळ अपघात झाल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे विशेषत: अकोला येथून वाशिमकडे एसटी बसने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.
................
पिण्याचे पाणी पुरविण्याची मागणी
जऊळका रेल्वे : गावात सार्वजनिक पाणीपुरवठ्याची प्रबळ व्यवस्था अद्याप उभी झालेली नाही. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होऊन त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याचे मुबलक पाणी पुरविण्याची मागणी अतुल कुटे यांनी सोमवारी केली.
................
विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय
मालेगाव : तालुक्यातील काही गावांमध्ये विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे सिंचन प्रभावित होत असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. महावितरणने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
.................
रेती घाटांचे लिलाव करण्याची मागणी
अनसिंग : रेतीघाटांचे लिलाव पाच वर्षांपासून झालेले नाहीत. यामुळे घरांचे बांधकाम अडचणीत सापडण्यासोबतच घरकुले, शौचालयांच्या बांधकामावरही परिणाम होत आहे.
................
रस्ता दुरुस्तीकडे लक्ष पुरवा
वाशिम : पाटणी चौकातून अकोला नाकाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. खड्डे पडण्यासोबतच गिट्टी बाहेर निघाल्याने वाहने चालविणे कठीण झाले आहे. रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी संदीप चिखलकर यांनी सोमवारी केली.
................
देयके अदा करण्याचे आवाहन
मंगरूळपीर : विद्युत ग्राहकांकडे लाखो रुपये थकबाकी असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत सापडले आहे. ही बाब लक्षात घेता ग्राहकांनी देयके अदा करावीत, असे आवाहन कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी केले.
.................
पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन
वाशिम : मार्च महिन्यानंतर शहरात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांनीदेखील पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन न.प.कडून करण्यात आले आहे.
................
वाहतूक विस्कळीत; रहदारीस त्रास
वाशिम : अकोला-नांदेड महामार्गावर दिवसभरातून अनेकवेळा वाहतूक विस्कळीत होत आहे. परिणामी, रहदारीस त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून वळणमार्ग निर्माण करण्याची मागणी जोर धरत आहे.
......................
‘त्या’ इमारतीची होणार दुरुस्ती
वाशिम : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर ‘त्या’ इमारतीची पडझड झाली आहे. केंद्रीय विद्यालयाने इमारत ताब्यात देण्याची मागणी मध्यंतरी केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाकडून इमारतीची दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
................
रस्त्याची दुरवस्था; एसटी चालक त्रस्त
वाशिम : स्थानिक बसस्थानक परिसरात असलेल्या रस्त्याला खड्डेच खड्डे पडले असून एसटी चालकांना वाहन फलाटावर लावताना कसरत करावी लागत आहे. ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी चालकांमधून होत आहे.
..................
वाशिममध्ये प्लॅस्टिक बंदीचा फज्जा
वाशिम : शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, याकरिता मध्यंतरी दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र त्यानंतर कारवाईत खंड पडल्यामुळे प्लॅस्टिक बंदीचा पूर्णत: फज्जा उडाला आहे.
..............
मोहरी येथे आढळला रुग्ण
मंगरूळपीर : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण काहीअंशी कमी झाले आहे. सोमवारी मंगरूळपीर तालुक्यातील मोहरी येथे एक रुग्ण आढळून आला. असे असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.