कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजारसह परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने उसंत घेतली आहे. तथापि, सततच्या पावसामुळे शेतीची कामे ठप्प झाली होती. त्यामुळे सद्य:स्थितीत शेतशिवारातील पिकात मोठ्या प्रमाणावर तण उगवल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे पिकांतील तण काढण्यासाठी शेतकरी मजुरांकडून लगबगीने निंदणी, खुरपणी करून घेत असल्याचे चित्र उंबर्डा बाजार परिसरात पाहायला मिळत आहे.
--------
मजुरांच्या हाताला मिळू लागले काम
जून महिन्याच्या अखेरपासून पावसाने मारलेली दडी आणि त्यानंतर सततची रिपरिप यामुळे शेतीकामे बंद पडली होती, परिणामी शेतमजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. मात्र, आता पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी निंदणी, खुरपणीसह खत देण्याच्या कामाला वेग दिला आहे. त्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.