वाशिम : नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या वाशिम पंचायत समितीत विकेंडला शुक्रवार, दि. २ जून रोजी दुपारी ३:३० वाजतानंतर कार्यालयीन वेळेत अनेक विभागातील कर्मचारी गायब असल्याचा प्रकार उपसभापती गजानन गोटे यांनी घेतलेल्या झाडाझडतीत आढळून आला.
वाशिम पंचायत समितीत अगोदरच कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यातच कार्यालयीन वेळेतही काही विभागातील कर्मचारी गायब राहत असल्याने कामकाज प्रभावित होत आहे. वारंवार समज देऊनही कामकाजात सुधारणा होत नसल्याने पदाधिकाऱ्यांनाही ग्रामीण जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी (दि.२) दुपारी ३ वाजताच्या सुमारास ग्रामीण भागातून काही नागरिक पंचायत समितीत कामानिमित्त आले होते. मात्र, खुर्चीवर संबंधित कर्मचारी आढळून आले नसल्याने ग्रामस्थांनी उपसभापती गजानन गोटे यांच्या कक्षाकडे धाव घेतली. याची दखल घेत उपसभापती गोटे यांनी अधीक्षक पी.एन. नांदे यांच्यासह बालाजी वानखेडे, दीपक खडसे व अन्य काही नागरिकांसह कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.
पंचायत, एमआरईजीएस, कृषी, सांख्यिकी, सामान्य प्रशासन आदी विभागात भेटी दिल्या असता, हालचाल नोंदवहित कोणतीही नोंद न करता काही कर्मचारी गैरहजर आढळून आले. गैरहजर कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने शिस्तभंगाची कार्यवाही करावी, अशा सूचना उपसभापती गजानन गोटे यांनी दिल्या.सभेत दिल्या होत्या सुधारणा करण्याच्या सूचना !
जिल्हा परिषदेच्या ३१ मे रोजीच्या स्थायी समितीच्या सभेत वाशिम पंचायत समितीच्या कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी गटविकास अधिकारी (बीडीओ) प्रफुल्ल तोटेवाड यांना दिल्या होत्या. कामकाजात सुधारणा करण्याची ग्वाहीदेखील बिडिओंनी दिली होती. परंतू, सभा होऊन एक दिवस उलटत नाही; तेच कार्यालयीन वेळेत कर्मचारी गायब असल्याने सुधारणा केव्हा होणार ? असा प्रश्न पं.स. सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.