वाशिम: आबालवृद्धांचे लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्त्याचे जिल्ह्यात मंगळवार, दि. १९ सप्टेंबर रोजी जल्लोष आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्हाभरात ६९६ सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली. यासाठी सकाळपासूनच ढोल-ताशा, गुलालाची उधळण, टाळ्यांचा नाद आणि मोरया... मोरयाचा गजर, असे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यात काही छोटी, मोठी सार्वजनिक गणेश मंडळे मिळून ६९६ मंडळांनी त्यांच्या भव्य गणेशमूर्तींना सोमवारी ढोल-ताशांच्या गजरात मंडपात आणले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लेझीमचा नृत्याचा फेर धरत गणरायाचे जोरदार स्वागत केले. सर्व सार्वजनिक मंडळांमध्ये सायंकाळपर्यंत विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरी भागांत २६६, तर ग्रामीण भागांत ४३० सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली. ‘श्रीं’च्या आगमनात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. ‘श्रीं’च्या विधिवत स्थापनेनंतर गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून, पुढील दहा दिवस या उत्सवादरम्यान ‘श्रीं’ची पूजा, आरती होणार आहे.
गणेशोत्सवासाठी असा आहे पोलिस बंदोबस्तश्री गणेशोत्सवानिमित्त वाशिम जिल्हा पोलिसदलाच्या वतीने ०१ पोलिस अधीक्षक, ०१ अपर पोलिस अधीक्षक, ०४ पोलिस उपअधीक्षक, १७ पोलिस निरीक्षक, ५५ सहा.पोलिस निरीक्षक, १० प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक, १२०० पोलिस अंमलदार, १५० प्रशिक्षणार्थी पोलिस अंमलदार, ०२ आरसीपी व ०२ क्यूआरटी पथक, ५७५ होमगार्ड, ०१ एसआरपीएफ कंपनी एवढा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
२२३ गावांकडून ‘एक गाव, एक गणपती’चा आदर्शसर्वांचा आवडता उत्सव असलेला गणेशोत्सव शांततेत, सलोख्याने आणि उत्साहात पार पडावा, या उद्देशाने पोलिसांकडून ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेचे आवाहन करण्यात आले होते. त्याला समाधानकारक प्रतिसाद लाभला आणि २२३ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेचा अंगीकार करीत इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला.