वाशिम : महाराष्ट्रातील ऐतिहासिक,सांस्कृतिक आणि पर्यटनाचा वारसा लाभलेल्या स्थळांना भेट देण्यासाठी "महाराष्ट्र राइड" या अभियानांतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी अडगाव (नाशिक) येथून दुचाकी वाहन यात्रेला प्रारंभ करणाऱ्या कमलेश बाफना या तरुणाचे गुरुवारी सायंकाळी वाशिम नगरीत आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी श्णमुगराजन एस. व जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
मूळ व्यावसायिक असलेल्या कमलेश बाफना यांना बालपणापासूनच भ्रमंतीची आवड असून महाराष्ट्र राज्य देशाला मोठा वारसा म्हणून लाभला आहे. बाफना संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांची माहिती संकलन करीत असून ३१ दिवसात वाशिम हा १४ वा जिल्ह्यात आगमन झाल्याची माहिती दिली .आतापर्यंत नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगांव खानदेश, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ असा ४३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला असून गुरुवारी वाशिम नगरीत आगमन केले . उर्वरित २२ जिल्हे पूर्ण करण्यास अजून दोन महिने व दहा हजार किलोमीटरचा प्रवास बाकी असल्याचे सांगितले. सन २००४ साली महाराष्ट्र ते गोवा राज्य असा दुचाकीने प्रवास केला हाेता. वाशिम येथील प्राचीन असलेले श्री बालासाहेब मंदिराला भेंट दिल्यानंतर शिरपूर जैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज मंदिराला भेट देऊन मेहकर येथील श्री शारंगधर बालासाहेब मंदिर व लोणार सरोवराला भेट देऊन हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचे बाफना यांनी सांगितले.
............
प्रजासत्ताक दिनी सुरू झालेल्या"महाराष्ट्र राईड"या अभियानांतर्गत आपण दररोज १५० किलो मीटरचा प्रवास करीत असून महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक पुरातन वास्तू, पर्यटनस्थळे, प्राचीन मंदिरे, सांस्कृतिक कला इत्यादींची माहिती संकलित करीत असून कोरोनापासून सुरक्षित कसे राहावे याचा प्रचार आपण करीत आहोत.
कमलेश बाफना
आडगांव,नाशिक*