...................
माेप प्रा.आ.केंद्राची रुग्णवाहिका परत मिळविण्यासाठी धडपड
भर जहाँगिर : मोप प्राथमिक आरोग्य केंद्राला नव्याने शासनाद्वारे नवीन रुग्णवाहिका प्राप्त झाली होती. परंतु अवघ्या सात-आठ दिवसांमध्ये सदर रुग्णवाहिका पासिंगच्या नावाखाली वाशिमला गेली असता ती परत पाठविली नाही. ती रुग्णवाहिका परत मोपला मिळण्यासाठी जनविकास आघाडीतील संदीप धांडे व शारदा आढाव या पंचायत समिती सदस्यांनी धडपड सुरू केली असून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
मोप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण २८ गावांचा समावेश आहे. सन २०१३ला येथे एक रुग्णवाहिका मिळाली होती. परंतु सदर रुग्णवाहिकेमध्ये सतत बिघाड होत हाेते. शासनाने मोप प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका बहाल केली. परंतु वाशिम येथे आरटीओ कार्यालयाकडे पासिंगसाठी गेलेली ती रुग्णवाहिका परत पाठवली नाही. यासंदर्भात राजकीय हस्तक्षेप झाल्याचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
तसेच माेप प्राथमिक आराेग्य केंद्राला आराेग्य सभापती चक्रधर गाेटे यांनी भेट दिली.
मोप प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेली रुग्णवाहिका राजकीय हस्तक्षेपाने पळविल्याची शक्यता असल्याने सदर रुग्णवाहिका परत मोप प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झाल्याशिवाय थांबणार नाही.
- शारदा रवींद्र आढाव
पं.स. सदस्य भर जहाँगिर