साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची तीव्रता आजमितीस नागरिकांना उगमत नसल्याने या कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपला असून, तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. दुसरी लाट ओसल्यानंतर कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पृष्ठभूमीवर नवे निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी लावले आहेत. कोरोनाचा प्रसार गर्दीद्वारे होतो आहे. त्यामुळे सार्वजनिक गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जाते. यात कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात येतात. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजार १५९ व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच मास्कचा वापर शहरात अनिवार्य करण्यात आल्यापासून ५९,१११ वाहनधारकांवर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करून १ कोटी ४३ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. कायद्याचा वापर करण्याचा मूळ हेतूच साध्य होत नसून, गर्दी आवरताना आजही प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.
--------------
बॉक्स: काय आहे कलम १८८
१)१८९७ साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार या काळात काही नियम लागू होतात. तसेच शासनाने निर्देशित केलेले सरकारी अधिकारी प्रतिबंधात्मक वेगवेगळे आदेश काढतात.
२)या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो.
३) विशेष म्हणजे कायदा मोडणाऱ्या व्यक्तीच्या कृत्यामुळे जीवित वा वित्तहानी झालीच पाहिजे असेही नाही. नियम मोडला की तो व्यक्ती गुन्हा दाखल करण्यास पात्र ठरतो.
-------------------
१) जिल्ह्यातील दाखल गुन्हे - ५१५९
२) वाहने जप्त -२२११
३) दंडवसुली - १,६९,१४, ७००
-----------
बॉक्स : काय होऊ शकते शिक्षा
१) साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार फक्त आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.
२) दुसऱ्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले आणि त्यातून मानवी जीवन वा आरोग्य धोक्यात सापडले तर, त्या व्यक्तीस सहा महिने कारवास किंवा एक हजार रुपये दंड वा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.
३) हा जामीनपात्र गुन्हा असून, मोठ्या संख्येने पोलिस कारवाईचे आकडे समोर येत आहेत. या गुन्ह्यांचे खटले काही महिन्यांनी कोर्टासमोर येतील. त्यातील काहींना दंड, शिक्षा मिळेल तर काही निर्दोष सुटतील.
--------------
कोट: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार कलम १८८ नुसार कारवाई केली जाते. मुळात दंड किवा शिक्षा करणे, हाच या कायद्याचा उद्देश नाही, तर जनतेला परिस्थितीचे गांभीर्य कळावे, त्यांनी नियमांचे पालन करावे म्हणून कारवाई करावी लागते. तथापि, जनता कायद्याचे पालन करण्याबाबत फारशी गंभीर नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-वसंत परदेसी ,
जिल्हा पोलीस अधीक्षक