२०० खाटांच्या सुसज्ज वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात सोनोग्राफी मशीन, एक्स-रे मशीन ‘लोकमत’ने वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे कोरोना संसर्गाच्या काळातच कार्यान्वित झाले; मात्र वर्षभरापूर्वी मिळालेले दंतरोग तपासणी मशीन तशीच धूळ खात पडून आहे. कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसचेही संकट उद्भवले असून, या पार्श्वभूमीवर हे मशीन रुग्णसेवेत कार्यान्वित व्हावे, अशी मागणी जोर धरत आहे.
.....................
... तर दातांचे आजार जडलेल्या रुग्णांना मिळेल मोठा आधार
दात किडणे, दात दुखणे, हिरड्यांचे आजार, व्यसनांमुळे जडणारे दातांचे विविध आजार सध्या बळावले आहेत. एकट्या वाशिम शहरात अशा व्याधीने त्रस्त शंभरापेक्षा अधिक रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी धाव घेत असल्याचे दिसून येते.
गुटखा, तंबाखूचे व्यसन करणाऱ्यांना विशेषत: मुख कर्करोगाचा धोका संभवतो. त्यामुळे रुट कॅनाॅल, दात काढणे, अक्कलदाढ काढणे, जबडा आणि हाडांच्या शस्त्रक्रिया करणे, आदी उपचारांवर रुग्णांना हजारो रुपये खर्च करावे लागतात. अशा स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात धूळ खात पडून असलेले दंतरोग उपचार मशीन कार्यान्वित झाल्यास ग्रामीण भागातील गोरगरिबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
....................
बाॅक्स :
खासगी रुग्णालयाचा खर्च न परवडणारा
दातांचे आजार जडल्यास होणाऱ्या वेदना असह्य असतात. त्याचा थेट परिणाम डोकेदुखीवरही होऊ लागतो. दातांच्या विविध स्वरूपांतील आजारांमध्ये दात काढून घेणे, सिमेंट अथवा चांदी भरून रुट कॅनाॅल करणे, जबडा व हाडाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. त्यावर हजारो रुपये खर्च होतात. खासगी रुग्णालयांचा हा खर्च गोरगरीब रुग्णांना न परवडणारा आहे.
..................
कोट :
जिल्हा सामान्य रुग्णालयात दंतरोग तपासणी मशीन उपलब्ध आहे; परंतु ते कार्यान्वित करण्यास लागणारी सुसज्ज खोली नव्हती. हा प्रश्न प्रथम प्राधान्याने निकाली काढण्यात आला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत मशीन रुग्णसेवेत कार्यान्वित होईल.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम