यंदा जिल्ह्यात जवळपास २७ हजार हेक्टरवर गहू पिकाची पेरणी झाली आहे. गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. विविध प्रकारच्या किडींसाठी ढगाळ वातावरण पोषक ठरत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. जवळपास १० हजार हेक्टरवरील गहू पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या किडीची अळी गहू पीक लहान असताना खोडात जमिनीलगत जाऊन आतील भागाला हाणी पोहोचवते. गहू पीक मोठे झाल्यावर ही अळी खोडात जमिनीपासून वर खोडातील भाग खाते, यामुळे दाने न भरताच ओंब्या वाळतात. वाणानुसार या किडीचा प्रादुर्भाव कमी-जास्त आढळून येत आहे. या किडीसाठी ढगाळ वातावरण, अधिक उष्णता, जास्त आद्रता असे वातावरण पोषक राहत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. काही ठिकाणी मुळावरील मावा तसेच पाने व खोडावरील मावा किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
००००००००००
‘मावा’मुळे नुकसानाची शक्यता अधिक
मुळावरील मावा मुळ्यांमधून रस शोषण करतो, यामुळे बुरशीची वाढ होऊन मुळसड रोगाचे प्रमाण वाढू शकते. परिणामी पीक कमजोर होते. किडींचे प्रमाण जास्त आसल्यास वाढ खुंटून पीक पिवळे पडू शकते. पिकाला पाणी कमी पडल्यास या किडीचे प्रमाण अधिक राहू शकते. पाने व खोडावरील मावा रस शोषण करतो व यामुळे झाडांची वाढ व्यवस्थित होत नसल्याने नुकसानाची शक्यता अधिक असते.
००००००००००
कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला
गहू पिकावर मावा, खोडकिडींसह अन्य किडींचा प्रादुर्भाव आढळून येत असला तरी नुकसानाची पातळी ओलांडली नाही. ही कीड नियंत्रणात येणारी असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाच्या सल्ल्याने कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिला.
००००००००००००००००