वाशिम: यंदा अमरावती विभागात वार्षिक सरासरीच्या ७६ टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यातच सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेऱ्या कडे पाठच केली आहे. अमरावती विभागात सरासरी १७६७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ५५१५९ हेक्टरवर या पिकाची पेरणी झाल्याची माहिती विभागीय कार्यालयातून शुक्रवारी प्राप्त झाली.अमरावती विभागात रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभरा आणि गहू या दोन पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर होते. एकूण सरासरी क्षेत्राच्या ५० टक्के अधिक क्षेत्रावर हरभरा, तर ३० टक्के क्षेत्रावर गहू या पिकाची पेरणी अमरावती विभागात होते. रब्बी हंगामातील सूर्यफुल आणि करडई या पिकांची पेरणी आता परवडणारी नसल्याने शेतकºयांनी या पिकांकडे गेल्या काही वर्षांपासून पाठ केल्यानंतर गहू पिकाचे क्षेत्र वाढले होेते; परंतु यंदा विभागात वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला. त्यातच प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत केल्याने शेतकरी गहू पिक पेरण्याची जोखीम पत्करूच शकले नाहीत. प्रकल्प आटले असतानाच भूगर्भातील जलपातळी कमालीची खालावल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. गहू या पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे विहिरीतील पाणी या पिकाला पुरण्याचा विश्वास शेतकºयांना राहिला नाही. परिणामी या पिकाच्या पेºयाकडे शेतकºयांनी पाठ केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ५३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत होती; परंतु या जिल्ह्यात केवळ २० हजार ४२० हेक्टरवर या पिकाची पेरणी झाली आहे. अकोल्यात सरासरी २२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ४१६० हेक्टर, वाशिम जिल्ह्यात सरासरी २०१०० हेक्टरपैकी ६१३०, अमरावती जिल्ह्यात सरासरी ४६ हजार ३०० हेक्टरपैकी १८३६०, तर यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ३५ हजार १०० हेक्टरपैकी केवळ ६१३० हेक्टरवर गहू पिकाची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामात यंदा एकूण क्षेत्राच्या ५० टक्के क्षेत्रावरही पेरणी झाली नसून, आता गव्हाच्या पेरणीला काही दिवस उरले असले तरी, पाण्याअभावी क्षेत्र वाढण्याची मुळीच शक्यता राहिली नसल्याचे दिसत आहे.