वाशिम : जिल्ह्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले होते. मात्र, लसीचा तुटवडा असल्याने या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्तास थांबविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कुटुंबातील तरुणांचे लसीकरण केव्हा होणार? याची चिंता ज्येष्ठांना लागली आहे.
देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. दुसऱ्या लाटेतही कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले; तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेलाही गती देण्यात आली. जिल्ह्यात १३१ केंद्रांमध्ये लसीकरणाची सुविधा आहे. मात्र, लसीचा तुटवडा जाणवत असल्याने कधी काही केंद्रे बंद ठेवण्यात येतात, तर कधी सर्वच केंद्रांमध्ये लसीकरण सुरू असते. १६ जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यास सुरुवात झाली. मात्र, काही दिवसातच लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. युवकांचे लसीकरण नेमके केव्हा सुरू होणारू याबाबत तूर्तास कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक हे चिंताग्रस्त असल्याचे दिसून येतात. कुटुंबातील युवकांचेही लसीकरण व्हावे, अशी अपेक्षा ज्येष्ठांमधून व्यक्त होत आहे.
००००
तरुण कामानिमित्त बाहेर जातात, त्यांनाही लवकर लस मिळावी
ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे, ही बाब स्तुत्य व स्वागतार्ह आहे. मात्र, तरुणवर्ग हा कामानिमित्त बाहेर जात असल्याने त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे तरुणांनादेखील लवकर लस मिळावी.
टी. एम. सरकटे
०००
कोरोनावर लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात येत असल्याने लसीकरणासाठी गर्दी होत आहे. दुसऱ्या लाटेत युवकांना कोरोना संसर्ग होत असल्याने युवकांनादेखील लवकरात लवकर लस मिळावे.
- संजयकुमार सरनाईक
००००००
युवकांसाठी १ मे पासून लसीकरणाला सुरुवात झाल्याने आनंदाचे वातावरण होते. परंतु, त्यानंतर अल्पावधीतच युवकांच्या लसीकरणाला ब्रेक मिळाला. युवकांनादेखील लवकर लवकर लस मिळावी, अशी अपेक्षा आहे.
- पांडुरंग सोळंके
00000