वाशिम : जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ पेक्षा अधिक दिवस उलटूनही २१ हजार ७७३ नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध करून दिलेल्या असल्याने २१ हजार लाभार्थ्यांनी लवकरात लवकर दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर, तसेच कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसांनी दिला जातो. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती तयार होण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेले २१ हजार ७७३ नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत. दुसऱ्या डोससाठी जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीचा पुरेसा साठा प्राप्त झाला आहे. कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. याकरिता जिल्ह्यात १३४ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. सध्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस लसीच्या उपलब्धतेनुसार दिला जात आहे.
०००००००००००००
दोन्ही लसी सारख्याच परिणामकारक !
कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोनावरील लस हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे लसीबद्दल मनात असलेला गैरसमज दूर करून १८ वर्षांवरील प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे यावे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी सुरक्षित असून त्या सारखेच काम करतात. रुग्णाला लस दिल्यानंतर दोन्ही लसींचा फायदासुद्धा एकसारखाच होतो. कोरोना लसीसंदर्भात पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांनी विहित कालावधीत दुसरा डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.
००००००
विहित कालावधीत दुसरा डोस घेणे गरजेचे !
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीरात निर्माण होते. पुरेशा प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी लसींचे दोन्ही डोस विहित कालावधीत घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी २८ दिवसांनंतर कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस तसेच कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी ८४ दिवसांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले.