अंगणवाडी केंद्रातील बालकांना पोषण आहार व अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी आधार नोंदणी आवश्यक आहे. आधार नोंदणी न झालेल्या बालकांना आफलाइन पद्धतीने योजनांचा लाभ देण्यात येतो. दरम्यान, अंगणवाडी केंद्रातील बालकांची आधार नोंदणी करण्यासाठी अंगणवाडी केंद्रातच पर्यवेक्षिकांना जवळपास ४० टॅब पुरविण्यात आले होते. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर बालकांची आधार नोंदणी सुरू केली जाणार होती; परंतु गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने २४ मार्चपासून देशात लाॅकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून आधार नोंदणीदेखील प्रभावित झाली. मध्यंतरी कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोंदणी पूर्ववत होत असताना, फेब्रुवारी ते मे या महिन्यांत कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यामुळे आधार नोंदणी पुन्हा प्रभावित झाली होती.
००००
आधार नोंदणीकडे लक्ष द्यावे
आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आवश्यक ती खबरदारी घेऊन अंगणवाडी केंद्रांतील आधार नोंदणी सुरू करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. यापूर्वी अनेक बालकांना आधार नोंदणी करता आली नाही. त्यामुळे आता आधार केंद्र सुरू करणे अपेक्षित ठरत आहे, असा सूर पालकांमधून उमटत आहे.