शासनाने मोठा गाजावाजा करून १८ वर्षावरील सर्वांना लस घेण्याचे सांगितले आहे. तशी सुरुवातही केली आहे मात्र अगोदरच अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षे वयावरील नागरिक आणि कर्मचारी हे दुसरा डोस घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांना अगोदर दुसरा डोस राखून ठेवून तो देण्याची मागणी करण्यात येत आहे.
मालेगाव शहरासह तालुक्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या भरपूर आहे. ते आता दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यातच शासनाने वय वर्षे १८ वरील नागरिकांसाठी लस देण्याचे आवाहन केल्याने लसीकरण केंद्रावर एकच गर्दी होत आहे. त्यामुळे शासनाने ४५ वर्षे वयावरील तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे त्या सर्वांना दुसरा डोस देण्याची व्यवस्था करावी किंबहुना जितक्या लोकांनी पहिला डोस घेतला आहे त्यांचे दुसरे डोस राखून ठेवावे आणि त्यांना मेसेजद्वारे किंवा फोनद्वारे सूचना देऊन तो डोस घेण्याचे आवाहन करावे, अशी मागणी होत आहे. लसीकरण केंद्रावर सध्या खूप गोंधळ उडत आहे. काही जणांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला तर काही जणांनी कोविशिल्डचा डोस घेतला आहे. काहींनी पहिला घेतला तर काही पहिला घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या सर्व गोंधळात अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच कर्मचारी कोरोनाच्या धास्तीने गर्दीत जाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे त्यांच्याकरिता दुसऱ्या डोसची व्यवस्था दुसरीकडे एका विशिष्ट ठिकाणी करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष संतोष तिखे यांनी केली आहे.