वाशिम : जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून पोषण महोत्सवाला सुरुवात झाली असून, याअंतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कुठे वृक्षारोपणाने मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यात येत आहे, तर कुठे परसबागेतून पोषण आहाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे. अंगणवाडी स्तरावर पोषण अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी सोमवारी, दि.२० सप्टेंबर रोजी सांगितले.
राष्ट्रीय पोषण महिना दरवर्षी १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात येतो. यंदाही कोरोनाच्या सावटाखाली नियमाचे पालन करीत पोषण महोत्सव साजरा केला जात आहे. मालेगाव, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा व वाशिम तालुक्यांतर्गत येणाऱ्या अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात येत आहे. कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे वृक्षारोपण करून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. आहार प्रात्यक्षिक व पौष्टिक आहार पाककृतीची प्रदर्शनी घेण्यात आली. यामध्ये परिक्षेत्रातील अंगणवाडी सेविका व स्थानिक महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मीना भोने, बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, पर्यवेक्षिका लता चव्हाण आदींची उपस्थिती होती. गरोदर महिला, स्तनदा महिला, किशोरवयीन मुली आणि कमी वजनाची बालके यांनी कशा प्रकारे आहार घ्यावा याबाबत माहिती देण्यात आली. झाडे जगविण्याची जबाबदारी पालक व ग्रामपंचायतीवर देण्यात आली. मालेगाव तालुक्यातील शिरपूर, डव्हा, अमानी, जऊळका रेल्वे, रिसोड तालुक्यातील चिखली, कवठा, व्याड, वाशिम तालुक्यातील अडोळी, तोंडगाव आदी ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
......................
पोषण आहाराबाबत जनजागृती
मुंगळा येथील अंगणवाडी केंद्रात पोषण आहाराविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी गृहभेटी देण्यात आल्या. कडधान्य, भाजीपाला व पारंपरिक पाककृतीबाबत पालकांचे व मातांचे समुपदेशन करण्यात आले. अंगणवाडी सेविका विमल पखाले, प्रभा काटकर, संगीता भांदुर्गे, चंद्रकला राऊत, मदतनीस सुरेखा राऊत, मीना बिहाडे, ज्योती मोरे व लाभार्थी यांची उपस्थिती होती.