पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट कंपनी कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी प्रभावी ठरलेल्या कोव्हिशिल्ड लसींचे उत्पादन करते. या कंपनीला दैनंदिन मोठ्या प्रमाणात पांढरा कोळशाची गरज भासत आहे. मंगरूळपीर येथील सहकारी जिनींग प्रेसिंग फॅक्टरीकडून कुठलाही मोबदला किंवा सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची प्रतीक्षा न करता केवळ सामाजिक कार्य म्हणून पांढरा कोळसा पुरविण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटकाळात मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव येथे कोलदांडीलाही बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. माजी जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी या कामाला गती दिली असून बंदीच्या काळातही पांढऱ्या कोलदांडीचे उत्पादन सुरूच आहे. अंत्यविधीसाठीदेखील कोलदांडीचा उपयोग होत असून सध्या दर आठवड्याला ३० ते ३५ टन पांढरा कोळसा सिरम इन्स्टिट्यूटला पुरविला जात आहे. तसेच कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी कोलदांडीचा उपयोग केला जात आहे. सोयाबीनच्या कुटारापासून कोलदांडीच्या माध्यमातून पांढरा कोळसा बनविण्याचे काम दैनंदिन सुरू असल्याचे कळविण्यात आले.
सिरम इन्स्टिट्यूटला मंगरूळपिरातून पुरविला जातोय पांढरा कोळसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:43 AM