निनाद देशमुख / रिसोड : तालुुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक प्रक्रियेने आता चांगलाच वेग धरला असून, प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.
रिसोड तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत आल्याने या ग्रामपंचायतींची ७ आॅक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सरपंचपदाच्या ४३० तर सदस्यपदाच्या ८५१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले असून रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांकडून प्रचार कार्यास वेग दिला जात आहे. तालुक्यातील दोन ग्रामपंचायती तसेच दोन सरपंच अविरोध झाले आहेत. चार ग्रामपंचायतीचे सदस्य अविरोध झाले असून, अन्य ग्रामपंचायतींचे मिळून एकूण १२१ सदस्य अविरोध झाले आहेत. सरपंच पदासाठी ४१ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होत आहे तर सदस्य पदासाठी ४० ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होत आहे.
सरपंच पदाच्या ४१ जागेसाठी १३४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून कुठे दुहेरी तर कुठे तिहेरी लढत होत असल्याचे दिसून येते. सदस्य पदाच्या २४० जागेसाठी ६३० उमेदवार रिंगणात आहेत. सदस्य पदासाठीदेखील कुठे थेट लढत तर कुठे तिहेरी लढत होत आहे. जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात रिसोड तालुका आपले ‘वजन’ ठेवून आहे. राजकीयदृष्ट्या तसेच ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणाºया ग्रामपंचायतीच्या निवडणुका अंतिम चरणात असल्याने लढती अटितटीच्या बनल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक ही कोणत्याही राजकीय पक्षावर लढविली जात नसली तरी ग्रामपंचायतीच्या सत्तेत आपल्या समर्थकांना, हितचिंतकांना बसविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्राम पंचायत निवडणूक ही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची रंगीत तालिम असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारतो, हे ९ आॅक्टोबरला मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल.