मराठा आरक्षणाबाबत शासनाने काढलेल्या अधिसूचनेनंतर दिवाळी साजरी झाली. त्याची अंमलबजावणी होऊन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महादिवाळी साजरी होईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. यामध्ये आंदोलकांवरील गुन्हे, सगेसोयऱ्यांना आरक्षण आदी मुद्दे आहेत.
सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. छगन भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकत नोंदवण्याचे ठरले असल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा. छगन भुजबळ राजीनामा का देत नाहीत?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. एका बाजूला मंत्रिमंडळातलं सर्व खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने राहायचं. छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठी आपला राजीनामा फेकून द्यावा, असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज वाशिम येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.
उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
राज्य सरकारच्या अध्यादेशामुळे मराठा समाजाचे हक्क त्यांना सहज उपलब्ध झाले आहेत. नोंदणीकृत मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळणे कायदेशीर होते. तसे करत असताना त्यांना १००% सुरक्षाही प्रदान करण्यात आली आहे. काही नेत्यांची वैयक्तिक भूमिका यावर वेगळी असू शकते. प्रत्यक्षात काय केले ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
सरकारने मराठा समाजाला फायदा होणारा निर्णय घेतला आहे. पण कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. यात कोणाचीही काळजी करण्याचे कारण नाही. आमचे सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले. नुकतेच मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात कायम ठेवण्यात आले. मात्र, काही कारणांमुळे सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण नाकारले. ही कारणे शोधण्यासाठी आम्ही एक सर्वेक्षण देखील सुरू केले आहे, अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली.